अकरा महिन्यांत 32 नवविवाहितांनी केली आत्महत्या

पिंपरी – ‘हुंडा, चारित्र्याचा संशय आणि किरकोळ कारणावरून केला जाणारा छळ’ या कारणावरून अनेक संसार मोडतात. काही नवविवाहिता तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्यांच्या कालावधीत 32 नवविवाहितांनी आत्महत्या केली आहे.

हुंडा घेणे आणि हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच हुंड्यासाठी छळ करणेही दखलपात्र गुन्हा आहे. कायद्याने जरी गुन्हा असला तरी आज अनेक विवाहिता हुंड्यासाठी बळी जात आहेत हे कटू सत्य आहे. काही घटनांमध्ये याबाबत गुन्हा दाखल होतोही. मात्र अनेक घटनांमध्ये गुन्हा दाखल होत नसल्याने आरोपी उजळ माथ्याने समाजात फिरताना दिसतात. नात्यांना जर विवाहापूर्वीच्या दुर्घटनांचे ग्रहण लागले असेल तर विवाहानंतर अनेक अडचणी येतात. त्यातून भांडणे, संशय, तिरस्कार वाढीस लागतो. संसाराची नवी स्वप्ने घेऊन घरात आलेल्या नवविवाहितेला सासरकडील मंडळींकडून घेरले जाते.

त्यांच्याशी एकटे लढताना चक्रव्युहातील अभिमन्यूसारखी तिची गत होते. मग मृत्यू हाच पर्याय असल्याचे समजून या विवाहिता मृत्यूला कवटाळतात. अनेक महिला गळफास घेऊन, विषारी औषध पिऊन आत्महत्या करतात.

नव्या संसारात विवाहितांना सासरकडील मंडळींकडून मानसिक आधाराची गरज असते. त्याचं मन मोकळं व्हायला हवं. सगळं संपलंय असं वाटू न देता जगण्याची उमेद शोधून जगता आलं पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या अकरा महिन्यात 45 नवविवाहितांनी आत्महत्या केल्या.

तर जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत 32 नवविवाहितांनी आत्महत्या केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत नवविवाहितेच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.