आठ वर्षांत शहरातील साडेचार हजार जण बेपत्ता

बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यास पोलीस अपयशी; तर नातेवाईक हतबल

पिंपरी – कौटुंबिक कारणातून तसेच प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ककालांतराने काहीजण मिळून येत असले तरी बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात अपयश येत असल्याचीच धक्‍कादायक बाब आकडेवारीवरून समोर आली आहे.

मागील आठ वर्षांत तब्बल चार हजार 440 जण बेपत्ता झाले असून त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. कित्येक वर्षे उलटूनही पोलीस या बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यास असमर्थ ठरले आहेत. मानवी तस्करी करणारी टोळी यामागे आहे की काय? अशी चर्चाही बेपत्ता व्यक्‍तींच्या नातेवाइकांमध्ये सुरू आहे. बेपत्ता झालेली लहान मुले, महिला, पुरुष आणि वृद्धांचे नेमके झाले तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून 2017 मध्ये दापोडीतून एका तरुणीला उत्तर प्रदेशात पळवून नेले. तिकडे तिचा खून केला असावा किंवा तिला विकले असावे, अशी शक्‍यता तिच्या नातेवाइकांनी व्यक्‍त करीत चार वर्षांनी भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 10) गुन्हा दाखल केला. तसेच पिंपरी येथून बेपत्ता झालेल्या तरुणीचा प्रियकराने खून करून मृतदेह डोंगरात फेकून दिला. वाकड पोलिसांनी तब्बल दहा वर्षांनी गुन्ह्याचा उलगडा करीत आरोपीला बेड्या ठोकल्या. बेपत्ता व्यक्‍तींबाबत दाखल झालेल्या या गुन्ह्यांमुळे शहरातील चार हजार 440 जण बेपत्ता झाले असून त्यांचे नेमके काय झाले, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत एकूण पंधरा पोलीस ठाणी येतात. या पोलीस ठाण्यांमध्ये दररोज मनुष्य हरविल्याच्या तक्रारी दाखल होतात. यातील बहुतांश प्रकरणामध्ये हरवलेला मनुष्य स्वतःहून मिळून येतो. तर, काहींना पोलीस शोधून काढतात. मात्र, काही प्रकरणामध्ये कसलाच धागा दोरा मिळत नसल्याने पोलीस बेपत्ता झालेल्या नागरिकांपर्यंत पोहचू शकत नाहीत. यापूर्वी पोलीस केवळ बेपत्ता म्हणून नोंद करीत होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्यास त्याचे अपरहरण झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यास सुरवात झाली आहे.

अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतरही त्याकडे गांभीर्यांने पाहिले जात नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मिसिंग प्रकरणामध्ये सुरुवातीला हरवलेल्या नागरिकाचे नातेवाईक चांगला पाठपुरावा करतात. पोलिसांवर अप्रत्यक्ष दबाव ठेऊन तपास करण्यास भाग पाडतात.

“ऑपरेशन मुस्कान’ची गरज
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेपत्ता मुलांची माहिती नव्याने संकलित करण्यात येते. यापूर्वी राबविण्यात आलेल्या “ऑपरेशन मुस्कान’ला चांगले यश मिळाले होते. आता नव्याने हे ऑपरेशन राबविल्यास अनेकांचा शोध लागू शकतो, असा विश्‍वास नातेवाईकांना असल्यामुळे “ऑपरेशन मुस्कान’ पुन्हा एकदा राबवा, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.