डेहराडून – तिहेरी तलाकविरोधात संघर्ष केलेल्या शायरा बानो यांना उत्तराखंड सरकारतर्फे राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. यावेळी उत्तराखंड प्रदेश भाजपचे अध्यक्ष बन्सीधर भगत व इतर नेते उपस्थित होते. तिहेरी तलाकच्या पद्धतीच्या घटनात्मकतेला सुप्रीम कोर्टात आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या. शायरा बानो या दहाच दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत.
मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचे माध्यम समन्वयक दर्शनसिंह रावत म्हणाले की, शायरा बानो यांच्यासह तीन महिलांना राज्याच्या महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला गेला आहे. इतर दोन महिलांमध्ये ज्योती शाह आणि पुष्पा पासवान यांचा समावेश आहे. आयोगात तीन जागा बऱ्याच दिवसांपासून रिक्त होत्या. नवरात्रीत मुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेली ही भेट आहे, असे ते म्हणाले.