प्रशासकीय सेवेतील “क्‍लास वन अचिव्हमेंट’

स्मिता झगडे

एक शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी जेव्हा आई होते, तेव्हा ती ज्या द्वंद्वात सापडते, त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही… एकीकडे अपार मेहनतीने मिळालेली नोकरी, त्यामागे असणारी महत्त्वाची जबाबदारी असते, तर दुसरीकडे अजाण, निरागस असा तिच्या काळजाचा तुकडा. तिला या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात… कोणत्याही एका गोष्टीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आयुष्यातला आनंद स्वतःच हिरावून घेण्यासारखा… मग ती निर्धार करते, दोन्ही गोष्टी सांभाळायचा. यासाठी मग पुणे-मुंबई-पुणे असा तीन-चार तासांचा जीवघेण्या गर्दीतला प्रवास ही ती करू लागते… पण नोकरी आणि बाळाचा सांभाळ यांची योग्य सांगड घालते… अर्थात ही तारेवरची कसरत सोपी अजिबातच नसते… तरीही कुटुंबियांच्या, विशेषतः पतीच्या भक्कम पाठिंब्यामुळे ती लीलया आपल्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडते. आजच्या काळातील नोकरदार महिलांचे उत्तम आणि आदर्श उदाहरण ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील करसंकलन विभागातील सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांची ही संघर्षगाथा म्हणूनच लक्षवेधी ठरते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत शांत आणि संयमी महिला अधिकारी म्हणून स्मिता झगडे यांचा नावलौकिक आहे. शांतपणे विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्मिताताईंना अनेक ठिकाणी विविध जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळण्याचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावरच त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागामध्ये सूसूत्रता आणली आहे. मागील वर्षीपेक्षा तब्बल 70 कोटी अधिक कर वसूल केला आहे, हे त्यांचे विशेष “अचिव्हमेंट’ !

स्मिताताई या मूळच्या अहमदनगर शहरातील. त्यांचे बालपण व शिक्षण अहमदनगरमध्येच झाले. शाळेत असताना त्यांनी राज्यस्तरीय खेळामध्ये यश मिळविले. अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. चित्रकला स्पर्धेमध्येही त्यांनी यश मिळवले. त्यानंतर कोल्हापूर येथील ऍग्रीकल्चरल महाविद्यालयामध्ये त्यांनी बीएससी ऍग्रीकल्चरलचे शिक्षण पूर्ण केले. एमबीए करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यासाठी दिल्लीला नंबर लागल्याने एवढ्या दूर जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यामध्ये राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेचा अभ्यास सुरू केला. हा अभ्यास करत असताना योग्य नियोजन आणि मेहनत केल्यामुळे त्यांना त्यामध्ये यश मिळाले. 2007 मध्ये स्मिताताईंना नायब तहसिलदाराची पोस्ट मिळाली.

खेड, मुळशी व हवेली तालुक्‍याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परीक्षेमध्ये यश मिळाल्यावर लग्नाचाही योग जुळून आला. लग्न होऊन त्या पुण्यामध्ये स्थायिक झाल्या. लग्नानंतर त्यांचा सुखी संसार सुरू झाला. नोकरी आणि संसार यांची सांगड घालत त्या भक्‍कमपणे पुढे जात होत्या. त्यामध्ये पतींचीही साथ होती. मात्र “क्‍लास वन’ची पोस्ट काढण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2009 मध्ये त्यांच्या घरामध्ये पाळणा हलला आणि एका चिमुकल्या पाहुण्याचे घरी आगमन झाले. लहान मुलाच्या येण्याने त्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होईल, असे घरच्यांना वाटले होते.

मात्र स्मिता यांनी लहान बाळाला सांभाळत अभ्यासावर लक्ष दिले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि बाळाच्या जन्मानंतर अवघ्या वर्षात त्यांनी मुख्याधिकारी वर्ग 1 (क्‍लास 1) ची पोस्ट मिळविली. स्मिता यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले; मात्र आता जीवनाची खरी कसोटी होती. कारण लहान बाळ आणि कुटुंबापासून दूर त्यांची मुंबईला पोस्टिंग झाली. मात्र स्मिताताईंनी हार न मानता कामाला सुरुवात केली. मुंबईतील वरळीमध्ये नगरपरिषद संचालनालयात त्या रुजू झाल्या. बाळ लहान असल्याने त्यांनी तीन महिने मुुंबई-पुणे असा दररोज प्रवास केला. नगरपालिकांचे वॉर्डस्तरीय रचना करण्याचे काम त्यांनी यावेळी केले. तसेच जवाहरलाल नेहरू नागरी अभियानाअंतर्गत पुणे विभागाचे विषय त्यांनी व्यवस्थित हाताळले.

सन 2011 मध्ये त्यांची अहमदनगर महापालिकेत बदली झाली. अहमदनगरला कर आकारणी विभागाची त्यांना जबाबदारी मिळाली. त्याठिकाणी त्यांनी “रेकॉर्डब्रेक’ वसुली केली. जप्तीची धडक कारवाई करत त्यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यास मदत केली. त्याठिकाणी त्यांनी करसंकलन विभागाबरोबरच घनकचरा व्यवस्थापन व भूमि जिंदगी हे विभागही सांभाळले. त्यानंतर स्मिताताईंची सन 2014 मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली. दरम्यान त्यांनी युपीएससीचाही अभ्यास सुरू केला. सन 2017 मध्ये मंत्रालयामध्ये प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्यावर आली. येथे त्यांच्या कुशलतेचा खरा कस लागणार होता. मराठवाडा हा भाग स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वात खालच्या क्रमांकावर होता. या विभागात असलेल्या 75 नगरपालिका आणि चार महापालिका यांना हागणदारीमुक्‍त करण्याची मुख्य भूमिका त्यांनी निभावली. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या नगरपालिका हागणदारीमुक्‍त होत्या.

स्मिताताईंनी तिथेही राजकीय नेते आणि प्रशासनाची सांगड घालत यामध्ये यश मिळविले. त्यांनी गावोगाव फिरत जनजागृती केली. नागरिकांना उघड्यावर प्रातर्विधीला गेल्यानंतर होणारे दुष्परिणाम समजावून सांगतिले. या कामामध्ये त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. केलेल्या कष्टाचे फळ हे गोडच असते. स्मिता यांनी मराठवाड्यासाठी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले. मराठवाडा विभाग हागणदारीमुक्त मध्ये खालच्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचला. यामध्ये स्मिता यांनी घेतलेले कष्ट वाखाण्याजोगे होते.

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत सन 2018 साली स्मिताताईंची बदली झाली. नवख्या शहरात आल्यानंतरही त्यांनी आपल्या कामाचा दर्जा अबाधित ठेवला. प्रथम त्यांच्याकडे नागरवस्ती विभाग होता. या विभागामध्ये दमदार कामगिरी करत त्यांनी विभागाचा चेहरामोहरा बदलला. लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पद्धतीने रक्कम जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. याला बराच विरोध झाला मात्र तो मोडून काढत त्यांनी कामामध्ये पारदर्शकता आणली. त्यामुळे नागरिकांना त्वरित लाभ मिळायला लागला. महिलांना व्यवसाय प्रशिक्षणाबरोबरच त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास सुरुवात केली. किशोरवयीन मुलींना प्रजनन व लैंगिक आरोग्य विषय शिक्षण त्यांनी सुरू केले. दिव्यांगासाठी पेन्शन योजना त्यांनी सुरू केली.

या योजनेचाही असंख्य दिव्यांगजनांना लाभ झाला. नागरवस्ती विभागासाठी असलेल्या निधीपैकी सर्वाधिक 85 टक्के निधी त्यांच्या काळात खर्च केला गेला. त्यानंतर त्यांची करसंकलन विभागामध्ये बदली करण्यात आली. सद्यस्थितीत त्या या विभागामध्ये जोरदार काम करत आहेत. लोकअदालत, जप्तीची कारवाई, प्रसिद्धी यामार्फत त्या जास्तीजास्त करवसुली करत आहेत. एक शांत, संयमी पण शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या स्मिताताईंनी आपल्या या वाटचालीसाठी आपल्या कुटुंबियांचा सर्वाधिक पाठिंबा असल्याचे सांगतात. त्यामुळेच स्मिताताई यशस्वी अधिकारी म्हणून काम करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये त्यांच्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केले जाते. कष्ट आणि मेहनत घेतली तर यश तुमच्या पायाशी येते याची प्रचिती त्यांनी दिली आहे. सद्यस्थितीला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न आज खूप ऐरणीवर आहे.

याबद्दल बोलताना स्मिताताई म्हणाल्या, मुलींनी, महिलांनी स्वतःची सुरक्षा स्वतःच कशी करता येईल, हे शिकले पाहिजे. भावनिक आणि शारिरीक ताकद वाढविली पाहिजे. एकाच गोष्टीमध्ये न अडकता मुलींनी वेगवेगळे क्षेत्रातले अनुभव घेतले पाहिजे. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढेल. कायदा प्रशासन मदत करते मात्र घटना घडू नये यासाठी मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Comment
  1. Prashant shete says

    Really grt and inspirable story…
    I got inspired

Leave A Reply

Your email address will not be published.