इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या सरकारवर विविध कारणाने सध्या सतत होत असलेल्या टिकेमुळे आपले माहिती आणि प्रसारण खात्याचे विशेषाधिकारी बदलून त्यांच्या जागी माजी लष्करी प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. तसेच त्यांनी आपल्या साऱ्या मीडिया टीम मध्येही फेरबदल केले आहेत.पंतप्रधान पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा असा प्रकार केला आहे.
माहिती आणि प्रसारण विभागातच्या पंतप्रधानांच्या विशेष सल्लागार डॉ. फिरदोस आशिक अवान यांच्या जागी आता लष्कराचे माजी प्रवक्ते लेफ्टनंट जनरल असिम सलीम बाजवा यांना आणण्यात आले आहे. बाजवा यांनी नवाज शरीफ पंतप्रधान असताना त्यांची माध्यमांमधील इमेज खूप वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते व त्यात त्यांना मोठे यश आले होते. पंतप्रधान इम्रान खान यांनी शिबली फराज यांची नवीन माहिती मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ते प्रख्यात उर्दु कवी अहमद फराज यांचे पूत्र आहेत. विज्ञान खात्याचे मंत्री फवाद चौधरी यांनी या नवीन नेमणुकांची माहिती दिली.
चौधरी यांच्याकडेच आधी माहिती खात्याचा कारभार होंता. सरकारचे मिडीया खाते निष्क्रीय असल्याची पंतप्रधान इम्रान खान यांची भावना झाली होती. सरकारने करोनाच्या काळात चांगले काम करूनही त्याला माध्यमांमध्ये योग्य प्रकारे सादर केले गेले नाही अशी इम्रान खान यांची तक्रार होती त्यामुळे त्यांनी आपली आज सारी मिडीया टीमच तडकाफडकी बदलून टाकली. देशात निर्माण झालेली करोनाची समस्या सुरुवातीच्या काळात सरकारने गांभीर्याने घेतली नाहीं त्यामुळेच हीं समस्या फोफावली अशी टीका त्या सरकारवर सातत्याने होत होती त्यामुळे इम्रान खान वैतागले होते असेही सांगण्यात येत आहे.