इस्लामाबाद – पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना “आयएसआय’ प्रमुखांच्या नियुक्तीवरून पाकिस्तानच्या लष्करी आणि सरकारमध्ये सहमती नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
“आयएसआय’ चे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल फैज हमिद यांना कायम ठेवण्यात यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याकडे काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.
अफगाणिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या राजकीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर हमिद यांनी आणखीन काही दिवस “आयएसआय’प्रमुखपदावर कायम ठेवण्यात यावे, अशी अपेक्षा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. असा आशयाचे वृत्त पाकिस्तानातील प्रमुख वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात सोशल मीडियावर सरकार आणि लष्करीतील विसंवादाचे चित्र उभे केले जात आहे. मात्र आज प्रमुख वर्तमानपत्रानेच याबद्दलचे वृत्त दिल्यामुळे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
पंतप्रधान इम्रान खान आणि लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यात यासंदर्भात दीर्घ चर्चा झाली आहे, असे सत्तारुढ तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रतोद आमिर डोगर यांनीही म्हटले आहे.
अफगाणिस्तानातील परिस्थिती सुधारेपर्यंत ले.जन. हमिद फैज यांना “आयएसआय’प्रमुख म्हणून कायम ठेवण्याची भूमिका पंतप्रधानांनी मांडली होती, यालाही आमिर यांनी दुजोरा दिला आहे. मात्र ले.जन. अंजुम यांच्या नयिुक्तीला त्यांचा विरोध नव्हता हे खरे आहे, असे ते म्हणाले. माहिती मंत्री फवाद चौधरी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.