इस्लामाबाद – अटक येथील तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना ढेकणांनी सतावले आहे. त्यांना उघडे न्हाणीघर असलेल्या सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना अगदी “सी’ दर्जाची सुविधा देण्यात येत आहे, असे त्यांचे वकील नईम हैदर पांजोथा यांनी माध्यामांना सांगितले.
इम्रान खान यांना ज्या सेलमध्ये ठेवले गेले आहे, तेथे मुंग्या, माशा, डास आणि ढेकणांचा मोठा प्रादुर्भाव आहे. उघडे न्हाणीघर असलेल्या एका छोट्या आणि अंधाऱ्या खोलीमध्ये त्यांना ठेवले गेले आहे, असे ऍड पांजोथा यांनी सांगितले. अटक तुरुंगात इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आपण संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवण्यासाठी तयार आहोत. मात्र पोलिसांनी अद्याप आपल्याला अटक वॉरंट देखील दाखवलेले नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. अटक करतेवेळी पोलिसांनी आपल्या पत्नीच्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्नही केला होता, असेही खान यांनी सांगितले.
तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी इस्लामाबादमधील न्यायालयाने दोषी ठरवून 3 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच लाहोरमध्ये पोलिसांनी इम्रान खान यांना अटक केली होती. अटक येथील तुरुंगातून इस्लामाबादेतील तुरुंगात हलवण्यासाठी इम्रान खान यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.