इम्रान खान यांनी स्वत:चे घर सांभाळावे-भारत

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून फटकारले
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून भारतावर टीका करण्याचे सत्र आरंभले आहे. त्याची गंभीर दखल घेत भारताने इम्रान यांना स्वत:चे घर सांभाळावे अशा कडक शब्दांत फटकारले.

संबंधित विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर इम्रान यांनी भारतविरोधी कांगावा केला. त्या विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचा आणि द्विपक्षीय करारांचा भंग होत आहे. ते विधेयक म्हणजे हिंदू राष्ट्र या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्पनेला पुढे नेण्याचाच भाग असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळाल्यावर इम्रान यांनी गुरूवारी पुन्हा आगपाखड केली.

उशीर होण्यापूर्वी जागतिक सुमदायाने हस्तक्षेप करावा, असे त्यांनी म्हटले. इम्रान यांच्या त्या नसत्या उठाठेवीचा समाचार घेताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी भारताची भूमिका मांडली. इतर देशांच्या अंतर्गत विषयांत पाकिस्तानने नाक खुपसू नये. पाकिस्तानात काय चालले आहे ते इम्रान यांनी पहावे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण त्यांनी करावे. त्या देशात धार्मिक अल्पसंख्याकांना प्रचंड जाचाला सामोरे जावे लागते, याकडे कुमार यांनी लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.