पुणे – बोचऱ्या थंडीने शहर आणि परिसराला हुडहुडी भरलेली असतानाच; हवामान विभागाने आणखी एक महत्वाची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा खराब झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, आता पुणे शहराची देखील हवा खराब झाली असून, मागच्या दोन महिन्यातील सर्वाधिक हवामान खराब असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे सामान्य पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्याचेही हवामान खराब होत चालले आहे. पुणेशहराच्या हवेची गुणवत्ता (सफर) खराब होत गेली आहे. पुणे शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. शहरातील सफर संस्थेच्या बुधवार (दि. 11) च्या अहवालानुसार दिल्लीनंतर पुण्याची हवा सर्वाधिक प्रदूषित प्रकारात गणली गेली आहे.
यामध्ये पुण्याने मुंबई, अहमदाबादलाही मागे टाकले असून, डिसेंबर-जानेवारीतील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरात पहाटे 3 ते 5 या काळातच सध्या हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे निष्पण्ण झाले आहे. त्यामुळे शहराच्या तापमानात एवढा फरक कसा असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
तर दुसरीकडे सफर संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास शहरातील शिवाजीनगर, हडपसर, भोसरी, आळंदी रस्ता या भागांतील हवा सर्वाधिक प्रदूषित ठरली असल्याचं सांगण्यात आलं आहे.