बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली -तूर्त 65 वर्षांवरील मतदारांना टपाल मतदानाची सुविधा उपलब्ध न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे चालू वर्षीच्या बिहार विधानसभा निवडणुकीत आणि इतर पोटनिवडणुकांत ती सुविधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.

करोना संकट विचारात घेऊन 65 वर्षांवरील मतदारांना टपाल मतदानाची सुविधा देण्याची शिफारस निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार केंद्रीय कायदा मंत्रालयाने नियमांत सुधारणा केली. मात्र, त्या सुधारणेवर अनेक विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला.

आता मनुष्यबळाचा अभाव आणि करोनाविषयक सुरक्षिततेचे नियम आदी बाबींमुळे नजीकच्या भविष्यात त्या सुधारणेची अंमलबजावणी केली जाणार नसल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले. संबंधित सुधारणेची अधिसूचना जारी न करण्याचा निर्णयही आयोगाने घेतला.

अर्थात, 80 वर्षांवरील मतदार, अपंग आणि अत्यावश्‍यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना टपालाद्वारे मतदान करण्याचा पर्याय बिहार निवडणुकीत उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय, करोनाबाधित आणि क्वारंटाईन केलेल्या मतदारांनाही टपालाद्वारे मतदान करण्याची मुभा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.