नीलकंठ मोहिते
रेडा -नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (दि.10) भेट घेऊन सहकार तसेच साखर उद्योग व इतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी दोन नेत्यांनी देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल मंत्री शहा यांचा सत्कार केला. यावेळी राज्यातील सहकारावर मंथन झाल्याने आगामी काळात सहकारपेरणी जोरात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील भाजपच्या दोन प्रमुख दिग्गज नेत्यांनी केंद्रीय मंत्री शहा यांची भेट घेतल्याने राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष या भेटीने वेधून घेतले आहे. पाटील हे राज्याचे सलग 7 वर्षापेक्षा अधिक काळ सहकार मंत्री होते. ते पणन मंत्री असताना केंद्र सरकारने कृषी विपणनसंदर्भात नेमलेल्या देशपातळीवरील विविध राज्यांच्या पणन मंत्र्यांच्या समितीचे अध्यक्षही होते.
महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत सहकार क्षेत्रात आघाडीवर आहेत. केंद्राने प्रथमच सरकार हे खाते निर्माण केल्याने खात्याचे मंत्रीपद शहा यांच्याकडे असल्याने देशातील सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. पाटील व विखे पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते
असल्याने शहा यांच्याशी झालेल्या भेटीची जोरदार चर्चा राज्यातील सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे. पाटील यांच्या सहकारातील अभ्यास व अनुभवाचा उपयोग भाजपकडून केला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर सहकाराचा मोठा प्रभाव आहे.
राज्यातील सत्तेच्या चाव्या सहकारच्या मैदानातून जात आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्रातील दोन नेत्यांची शहा यांच्याशी झालेली भेट राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.