पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळामध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वीच्या संकेतस्थळावरील ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांची खाती बंद करून नवीन संकेतस्थळावर वर्ग करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन अर्ज प्रणालीतील तपशील अद्ययावत करावेत, अशा सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षार्थी उमेदवारांना दिल्या आहेत.
अद्यापही बहुतांश उमेदवारांनी पासवर्ड व खात्यातील तपशील अद्ययावत केले नसल्याचे निदर्शनास येत आहे. नजिकच्या काळात प्रलंबित भरतीप्रक्रियांच्या उर्वरित पुढील प्रक्रिया व नव्याने राबविणाऱ्या येणाऱ्या भरती प्रक्रियांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची खाती अद्ययावत करणे आवश्यक आहे. खाती अद्ययावत असल्याशिवाय उमेदवारांना नवीन अर्ज सादर करणे शक्य होणार नाही. ऐनवेळी नवीन खाते तयार करणे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी तातडीने आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवरील त्यांच्या खात्याचा पासवर्ड व खात्यातील तपशील अद्ययावत करणे अनिवार्य आहे.