पुणे – घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने यंदा फिरते हौद तसेच मूर्तीदानाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तसेच काही सोसायट्यांनी आपल्या आवारातच गणपती मूर्ती विसर्जन व्यवस्था केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नागरिकांनी शक्यतो घरीच मूर्ती विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. त्याला दीड, तीन, पाच आणि सात दिवसांच्या गणपती मूर्ती विसर्जनावेळी पुणेकरांनी प्रतिसाद दिला आहे.
पुणे शहरात दरवर्षी साधारणपणे पाच लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होते. या मूर्तींचे मोठ्या थाटात विसर्जन करण्यात येते. कुटुंबीय, शेजारी, मित्र-मैत्रिणी अशा गोतावळ्यासह वाजत-गाजत, “गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. शहरात गणेशभक्तांची मोठी वर्दळ असते. मात्र, यंदा करोनामुळे मिरवणूक काढण्यास, नदी अथवा कृत्रिम हौदात गणेश मूर्तींचे विसर्जनास महापालिका प्रशासनाने बंदी घातली आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन या हौदात करू शकतील. तसेच विविध शाळांमध्ये मूर्तीदानाची व्यवस्थादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा विसर्जन सोहळा अत्यंत साधेपणाने, तसेच सावधता बाळगून साजरा करण्यावर प्रशासन आणि नागरिक या दोन्हींकडून प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, शहरात दीड, पाच, सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्ज नुकतेच पार पडले. यावेळी फिरत्या हौदांत मूर्ती विसर्जन करण्यापेक्षा मूर्ती दान करण्याला नागरिकांनी जास्त प्राधान्य दिल्याचे महापालिकेच्या नोंदीतून समोर आले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दि.28 ऑगस्टपर्यंत सुमारे 36 हजार 453 गणेश मूर्ती संकलित झाल्या आहेत.