सर्वाधिक 34 हजार 700 विद्यार्थ्यांचा इयत्ता अकरावीसाठी प्रवेश

पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी पहिल्या फेरीत राज्य मंडळाच्या 58 हजार 564 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील 34 हजार 700 विद्यार्थ्यांचा सर्वाधिक प्रवेश झाला आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या 3 हजार 751 विद्यार्थ्यांना या फेरीत स्थान मिळाले.

प्रवेशाच्या पहिल्या फेरीचा निकाल रविवारी जाहीर झाला. दुपारी 3 वाजता पोर्टलवर गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सायंकाळी 6 वाजता जाहीर झाली. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी किमान 1 व कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती नोंदविण्याची मुभा दिली होती. त्यानुसार शाखानिहाय पसंतीक्रमानुसार गुणवत्ता यादी जाहीर झाली. 19 हजार 575 विद्यार्थ्यांना पहिला पसंतीक्रम नोंदविल्यानुसार प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले.

दुसऱ्या पसंतीक्रमानुसार 6 हजार 702 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. तिसऱ्या पसंतीक्रमानुसार 4 हजार 174, चौथ्या पसंतीक्रनानुसार 2 हजार 840, पाचव्या पंसतीने 2 हजार 138, सहाव्या पसंतीने 1 हजार 503, सातव्या पसंतीने 1 हजार 66, आठव्या पसंतीने 844, नवव्या पसंतीने 629, दहाव्या पसंतीनुसार 542 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले.

जात संवर्गाच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. यात खुल्या प्रवर्गातील 14 हजार 943 विद्यार्थ्यांचा सर्वाधिक प्रवेशात समावेश आहे. कोटा प्रवेशानुसार एकूण 6 हजार 227 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. यात सर्वाधिक इनहाऊन कोट्यातून 4 हजार 131 प्रवेश निश्चित झाले. कोटा प्रवेशातील 17 हजार 771 जागा अद्यापही रिक्त आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.