पुणे – यंदा केवळ पन्नास ते साठ हजार मूर्तींचेच विसर्जन फिरत्या हौदात होईल, असा दावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला. दीड दिवसांच्या गणपतींचे, मागील वर्षी हौदांतील विसर्जन आणि मूर्तीदान यावरून हा अंदाज काढल्याचे मोहोळ यांनी सांगितले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.
पाच-सात दिवसांच्या आणि दहा दिवसांच्या गणेशाच्या विसर्जनाची आढावा बैठक मोहोळ यांनी घेतली. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेते, क्षेत्रीय आयुक्त, संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. मागील वर्षी हौदात विसर्जित आणि मूर्तीदान केलेल्या मूर्तींची संख्या एकूण 3 लाख 55 हजार होती.
काही नागरिकांनी घरीच, तर काहींनी नदी, कॅनॉल, जवळपासच्या तलावांमध्ये, जलस्रोतांमध्ये विसर्जित केल्या. मात्र, यंदा करोनामुळे जलाशयांच्या ठिकाणी गर्दी करण्यास बंदी आहे. त्यामुळे फिरते हौद ठेवण्यात येणार आहेत.