तालुक्‍यातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टॅंकरने पाणीपुरवठा करा

सभापती उज्वला जाधव यांच्या मासिक सभेत सूचना

पाटण – पाटण तालुक्‍यात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ज्या भागात अद्याप टॅंकर सुरू नाही अशा गावांना तात्काळ टॅंकर देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना सभापती उज्वला जाधव यांनी शनिवारी झालेल्या पंचायत समितीची मासिक बैठकीत दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपसभापती राजाभाऊ शेलार, प्रतापराव देसाई, पंजाबराव देसाई यांच्यासह सदस्य विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शिक्षण विभागाचा लाचखोरपणा आज झालेल्या पंचायत समितीच्या सभेत बऱ्याच दिवसापासून गाजत असलेला लाचखोरपणा बाहेर आला. तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यासाठी वेतन निश्‍चिती व विकल्प सादर करण्याच्या नावाखाली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने गुरूजींकडून सक्‍तीची वसुली सुरू केली होती. मात्र या घटनेची कोठेही वाच्यता होत नव्हती.

शिक्षकांमध्ये याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. मात्र आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य सुरेश पानस्कर यांनी सुरवातीलाच हा विषय काढला. मात्र नेहमीप्रमाणे पांघरून घालण्याचे उपसभापती राजभाऊ शेलार यांनी केले. वर्तमानपत्रातील बातम्यांचा आधार घेवून सभागृहात विषय मांडू नका अशा सूचना केल्या. मात्र शिक्षणाधिकारी यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली. त्यावर पुढच्या बैठकीला याबाबतची सर्व माहिती आणा, अशा सूचना उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी दिल्या.

तालुक्‍यात सगळीकडे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोरगिरी विभागातील किल्ले मोरगिरी व ढेबेवाडी विभागातील आंब्रुळकरवाडी या गावांना सध्या पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एम. डी. आरळेकर यांनी दिली. मणदुरे विभागातील केरळ, धडामवाडी, मेढोंशी, सुरूल या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यासाठी काय उपाययोजना करावी लागणार आहे याची खबरदारी संबंधित विभागाने घ्यावी. मुटलवाडी याठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

पंचायत समितीची बोअरवेलची गाडी नादुरूस्त असून यामुळे बोअरवेल दुरूस्त करता येत नाही. गाडी दुरूस्त होत नसेल तर भंगारात विका असा सल्ला पंजाबराव देसाई यांनी दिला. मात्र बोअरवेलच्या गाडी दुरूस्तीवरून सदस्या सीमा मोरे चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. अधिकारी कर्मचारी आमचे ऐकत नसतील तर आम्ही लोकांना काय सांगणार असा प्रश्‍न उपस्थित करून तात्काळ उपाययोजनांची मागणी केली. महावितरण कंपनीने पाणीटंचाई काळात कोणत्याही पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्‍शन तोडू नये. कुंभारगाव विभागातील चाळकेवाडी याठिकाणी असणारा धोकादायक विजेचा खांब तात्काळ बदलावा, अशी मागणी केली. तर तालुक्‍यातील गंजलेले जुने वीजवाहक खांब बदलण्यासाठी 45 लाखांचे अनुदान आल्याची माहिती अभियंता कांबळे यांनी दिली.

शिक्षण विभागात पदवीधर 77, शिक्षक 44, विस्तार अधिकारी 2, केंद्रप्रमुख 24 अशी रिक्‍तपदे आहेत. शारिरीकदृष्ट्या दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्‍यात संसाधन कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 50 हजार रूपयांचे अनुदानप्राप्त झाल्याची माहिती प्रभारी गटशिक्षण अधिकारी नितीन जगताप यांनी दिली तालुक्‍यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून ज्या गावात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या पाण्यात टीसीएलचा वापर करावा. तालुक्‍यात एकूण तेरा प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना डॉ. दिपक साळुखें यांनी केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.