जिल्ह्यात समाजकल्याण अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करा

अशोक गायकवाड यांची समाजकल्याण मंत्र्यांकडे मागणी: दै. “प्रभात’च्या वृत्ताने पाठपुरावा सुरू

सातारा –
सहायक समाज आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद दोन्ही विभागांत प्रमुख समाजकल्याण अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्या पदांवर कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश म्हातेकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. त्याचबरोबर आंतरजातीय विवाह प्रोत्साहन निधीदेखील तात्काळ वितरित करण्याची मागणी गायकवाड यांनी केली.

दरम्यान, दै. “प्रभात’ने पूर्णवेळ समाजकल्याण अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहन निधी वितरित करण्याचा प्रश्‍न प्रलंबित असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिध्द केले होते.
समाजकल्याण मंत्र्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सातारा जिल्हा हा पुरोगामी विचारांचा आहे. मात्र, आज सरकारच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्याचा पुरोगामी विचारांचा वारसा पुसला जात आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. जिल्हा परिषद व सहायक आयुक्त कार्यालय या दोन्ही कार्यालयांमध्ये सहा महिन्यांपासून प्रमुख तथा सहायक आयुक्त

पदावर व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही. दोन्ही कार्यालयाचा कार्यभार पुणे व सांगली येथील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. परिणामी दोन्ही कार्यालयातील कामकाज ठप्प आहे. त्यामुळेच शोषित घटकांच्या योजना मार्गी लागताना विलंब होत आहे. हे टाळण्यासाठी दोन्ही कार्यालयांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी पूर्णवेळ व सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने जातीअंताच्या लढाईला सुरूवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून आंतरजातीय विवाह योजना अंमलात आणण्यात आली. त्यासाठी सरकारने प्रोत्साहनपर अनुदानदेखील जाहीर केले. मात्र, मागील एक वर्षापासून सातारा जिल्ह्यातील 131 दांम्पत्यांना अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही.

तरी तात्काळ अनुदान वितरित करून दांम्पत्यांना प्रोत्साहित करावे. जेणेकरून येत्या काळात आंतरजातीय विवाह होण्याचे प्रमाण वाढेल आणि खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीअंताचा विचार आपणा सर्वांना पुढे घेवून जाता येईल, असे देखील गायकवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.