पिंपरी – दारू पिण्यासाठी तसेच मौजमजा करण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून वाहने चोरणाऱ्या एका सराईत चोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन वाहने हस्तगत केली. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली.
रवी उर्फ राजेश बंडू थोरात (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार नारायण जाधव यांना आरोपीबाबत माहिती मिळाली त्यानुसार म्हातोबानगर झोपडपट्टी येथून आरोपी थोरात याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने दारू पिण्यासाठी तसेच मौजमजा करण्यासाठी 90 हजार रुपयांची वाहने चोरल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे वाकड, हिंजवडी आणि निगडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. रवी पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत आहे. त्याच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात 2016 साली दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.