पिंपळे निलख – पिंपळे सौदागर येथील स्व. रामभाऊ गोडांबे मार्गावर असलेल्या उद्याना शेजारी रहदारीच्या रस्त्यावर अवैध पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नो-पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपळे सौदागर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाला लागून असणाऱ्या व अनेक उच्चभ्रू रहिवासी सोसायटीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवैध पार्किंग करण्यात येत आहे. स्व. रामभाऊ गोडांबे हा रस्ता जवळपास वीस फूट रुंद असून, याठिकाणी रस्त्याला लागूनच महापालिकेचे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे. उद्यानासाठी असणाऱ्या पार्किंगवर बाहेरून येणाऱ्या शाळेच्या खासगी बसेस व इतर वाहने उभी केली जात आहेत. या ठिकाणी असणारे रहिवासी बस चालकांना विनंती करून या ठिकाणी वाहने पार्किंग करू नये म्हणून सांगत असून मात्र उलट वाहन चालक नागरिकांनाच आता न जुमानता उलट अर्वाच्य बोलत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी असलेल्या शाळेने आपल्या शाळेच्या आवारात पार्किंग साठी जागा देणे बंधनकारक असतांना मात्र रहदारीच्या रस्त्यावर आपल्या शाळेच्या व पालकांच्या वाहनांना लावून अडथळा निर्माण होईल करू नये अशी नागरिकांची अपेक्षा आहे. याठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाने या ठिकाणी होत असलेल्या अवैध पार्किंगवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
उद्याना समोरच शाळेच्या बस
संभाजी महाराज उद्यानाच्या समोर एका खासगी शाळेच्या बस पार्किंग करण्यात येत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या लहान व मोठ्या जवळपास तीस ते चाळीस बसेस चालक सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत कोणालाही न जुमानता व वाहतुकीस अडथळा होईल, अशा प्रकारे लावत आहेत. या रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच उद्यानात येणाऱ्या नागरिकांना पार्किंगसाठी जागा उरत नाही. परंतु महापालिकेचा उद्यानविभाग याकडे लक्ष देताना दिसून येत नाही.
या परिसरात मी गेले दहा वर्षे राहत आहे. या अगोदर शाळेची व पालकांची वाहने उभी राहत नव्हती परंतु आता बसेस व इतर दुचाकी वाहने उभी राहत असल्याने सोसायटीच्या लहान मुलांना व रहिवाशांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी काही अपघात घडल्यास संबंधित शाळा प्रशासन किंवा इतर कोणी जबाबदारी घेईल का? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
– मंगल अहिरराव, रहिवासी.
याठिकाणी होत असलेले पार्किंग अवैध आहे. त्यामुळे रहादरीस अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात महापालिका अतिक्रमण तसेच वाहतूक पोलीस यांना निवेदन देण्यात येणार आहे.
– संदीप दुसाने, रहिवासी.