अनधिकृत फ्लेक्‍स; टोल फ्री क्रमांकावर तीनच तक्रारी

पुणे -गेल्या आठवड्यापासून शहरात अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर्सना ऊत आला असताना, महापालिकेकडून जाहीर केलेल्या “टोल फ्री’ क्रमांकावर मात्र केवळ तीनच तक्रारी आल्या आहेत.

फ्लेक्‍स, बॅनर्स, जाहिराती लावण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून शुल्क आकारून रितसर परवानगी दिली जाते. एवढेच नव्हे तर ठराविक ठिकाणीच हे लावण्याची परवानगी मिळते. तसेच, हे लावताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच ते लावणे बंधनकारक आहे. अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई न केल्यास न्यायालयाने थेट आयुक्‍तांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र, हे सगळे नियम धुडकावून, महापालिका प्रशासनाची परवानगी न घेताच शहरात बेकायदेशीरित्या फ्लेक्‍स लावण्यात येतात आणि शहर विद्रुप केले जाते.

अशा प्रकारे बेकायदेशीर जाहिरातबाजी करणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने 18002336679 हा “टोल फ्री’ क्रमांक जाहीर केला आहे. हा क्रमांक आणि याची माहिती महापालिकेच्या संकेत स्थळावरही देण्यात आली आहे.

या टोल फ्री क्रमांकावर 14 सप्टेंबर रोजी 1 तक्रार, 16 तारखेस 1 आणि 17 तारखेला (मंगळवार) 1 अशा केवळ 3 तक्रारी आल्या आहेत. तर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात केवळ 2 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या निरीक्षकांना पाठवण्यात आल्याचे आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख डॉ. मनोजकुमार डोईफोडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.