शिरूर तालुक्यात बेकायदेशीर कामांची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता
शिक्रापूर – शिरूर तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या अनेक जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचे कित्येक प्रकार यापूर्वी उघडकीस आलेले असताना, आता शिरूर तालुक्याच्या तहसील कार्यालयातून धान्यांचा पुरवठा तसेच शिधापत्रिका बनविण्याचे काम पुरवठा विभागातील शासकीय व्यक्तींकडून न होता खासगी व्यक्तीकडून होत आहे. याबाबत यापूर्वी तक्रारी येवून देखील शिरूरचा पुरवठा विभाग आज देखील खासगी व्यक्तीच्या हाती आहे. त्यातून बेकायदेशीर कामे होण्याची दाट शक्यता आहे.
शिरूरचे तत्कालीन तहसीलदार रणजीत भोसले यांची बदली झाल्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये नव्याने रुजू झालेले तहसीलदार गुरु बिराजदार यांनी शिरूरचा कारभार स्वीकारला. यानंतर तहसील कार्यालयामधील माहिती घेतली असताना त्यांना पुरवठा विभागाचा कारभार खासगी व्यक्ती पाहत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मार्च 2019 मध्ये तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात एका शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक करीत पुरवठा विभाग सांभाळत असलेला खासगी व्यक्तीला त्याठिकाणी येण्याबाबत मनाई केली होती.
तत्कालीन तहसीलदार गुरु बिराजदार यांनी त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी नियुक्त केल्यानंतर हा पुरवठा विभागाचा कारभार सुरळीत सुरू होता. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार बिराजदार यांनी काही दिवस तेथे नेमलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या जागेवर तोंडी पद्धतीने दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती केली; परंतु दि. 9 सप्टेंबर 2019 रोजी तहसीलदार बिराजदार यांची बदली होताच पुरवठा विभागात काम करीत पुरवठा विभाग सांभाळणारी खासगी व्यक्ती पुन्हा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात उपस्थित होऊन तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आजदेखील शिरूर तहसीलच्या पुरवठा विभागाचा कारभार एका खासगी व्यक्तीच्या हाताने होत असल्यामुळे नागरिक, रेशन दुकानदारांची पिळवणूक होत आहे.
या खासगी व्यक्तीकडून अनेक बेकायदेशीर कामे होत असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. तहसील कार्यालयातील कारभार शासकीय व्यक्तीच्याच हाती असावेत. त्यामुळे खासगी व्यक्तीला तेथून मुक्त करून शासकीय व्यक्ती नेमण्याची, खासगी व्यक्तीला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पाठबळ?
शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग सांभाळणाऱ्या खासगी व्यक्तीकडून नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ रेशनधान्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना देखील अरेरावी केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तरीही पुरवठा विभागातील खासगी व्यक्ती आज देखील कार्यरत आहे. त्यामुळे या व्यक्तीला कोणात्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे.
यापूर्वी या व्यक्तीच्या तक्रारी आल्यानंतर मी त्याला काढले होते. परंतु या खासगी व्यक्तीने त्याच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑपरेटर लॉगिन आयडी आणलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला काहीही न विचारता या व्यक्तीस ऑपरेटर लॉगिन आयडी देण्यात आलेला आहे.
– लैला शेख, तहसीलदार, शिरूर
शिरुरच्या तहसीलदार यांच्याशी चर्चा करून माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ.
– संतोषकुमार देशपांडे, प्रांताधिकारी