“पप्पा’ आमच्या आयुष्यातील तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. कारण जीवनाचे धडे देणारे तुम्ही एक शिक्षक होता आणि आमचा बचाव व संरक्षण करणारे “वकील’ही होता! तुम्ही आमचे नायक व सेवकही होता. तुमच्या अस्तित्वाने भरलेले आमचे अवकाश तुमच्या जाण्याने रितं झालं. एक पोकळी भरून राहिली. घराचा, आम्हा मुलांचा आधारवड हरपला, मायेची सावली गेली!
“फादर्स डे’च्या निमित्ताने खुशालचंद पगारिया यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या मुलांनी त्यांना ही शब्दपुष्पांजली अर्पण केली….
आपल्या हृदयात कायम राहणारे आपले प्रियजन कधीही न परतण्यासाठी आयुष्यातून निघून जातात तेव्हा अपार दु:ख होते; पप्पा गेले तेव्हा आमचेही असेच काहीसे झाले असल्याचे श्रीकांत सांगतात.
त्यांच्या जाण्याने आम्हा भावंडांचं मन कशातच लागेना! पप्पांनी आम्हाला खऱ्याअर्थी जगायला शिकवलं. जगाकडे पाहायची वेगळी दृष्टी दिली. केवळ माणसांशीच नाही तर सर्व प्राणिमात्रांकडे ममतेने पाहायची शिकवण दिली. नातेसंबंध, मैत्रीसंबंध कसे राखावेत आणि जगात वागावे कसे, याचे पाठ आम्हाला दिले.
एका अर्थी मानवतेची ज्योत आमच्या हृदयात पेटवली. जगाला प्रेमाने जवळ घ्यावे आणि दु:खी-कष्टी जीवांचे अश्रू पुसावे हे आम्हाला शिकवले, आत्मविश्वासाने उभे राहायची प्रेरणा दिली. खरे म्हणजे आयुष्य म्हणजे काय हेच तुम्ही आम्हाला शिकवले होते.
पप्पा आज शरीराने आमच्यामध्ये नसले तरी त्यांच्या स्मृतींचा सुगंध नेहमीच आमची साथ करत राहणार आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पप्पांची आठवण येत राहते. त्यांचे बोल आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. ते आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक दीपस्तंभ होते.पप्पांनी दिलेला वसा असाच चिरंतन जिवंत ठेवण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
खुशालचंद यांनी आपल्या वागणुकीने सर्वांना आपलेसे केले होते. त्यांचा मित्रपरिवारही खूप मोठा होता. त्यांना खाण्याची आणि खायला घालायची खूप आवड होती. त्यांचे एक जिवलग मित्र त्यांची आठवण काढताना सांगतात, त्यावेळी पगारिया निवास म्हणजे नुसता निवास नव्हे तर अल्लाउद्दिनच्या चिरागा’प्रमाणे ती वास्तू होती! प्रत्येकाच्या मनात एक मायेचा, आपुलकीचा ओलावा होता! आदरातिथ्य कसे करावे; याचे शिकवण देणारी शाळा होती ती…! त्यांची आठवण काढताना ते म्हणतात,
जिन्दगी ऐसी बना जिन्दा रहे दिल याद तू,
जब न हो दुनिया में तो दुनिया को आए याद तू
– श्रीकांत, शैलेश, राजश्री, प्रीती, कल्पना, डॉ. किशोर व पगारिया परिवार