हिंगोली- राज्यात करोनाचा कहर सुरू असल्याने डॉक्टर, नर्ससह पोलीसही रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यात हिंगोलीत कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जितेंद्र साळी (वय 43) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. हिंगोली पोलीस मुख्यालयातील आरमार विभागात ते कार्यरत असताना त्यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
हिंगोली येथील पोलीस मुख्यालयातील आरमार विभागात (शस्त्र दुरुस्ती) जितेंद्र साळी हे कार्यरत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ते विभागात कामासाठी आले होते. त्यानंतर दुपारी त्यांनी कार्यालयातच रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली.
मुख्यालयातून गोळी झाडल्याचा मोठा आवाज आल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी साळी यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.