पणजी – आंतरराष्ट्रीय चित्रपट-दूरचित्रवाणी आणि दृक श्राव्य माध्यम परिषद म्हणजेच ICFT-युनेस्कोतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलीनी या पदकाने इफ्फीचा गौरव केला जाणार आहे. या महोत्सवाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदापर्ण केल्याबद्दल आयोजकांना हा सन्मान दिला जाईल, असे ICFT चे महासंचालक जॉर्ज ड्युपाँ यांनी सांगितले. इफ्फीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ICFT च्या प्रकल्प व्यवस्थापक झुएन हुन हेही यावेळी उपस्थित होते.
जगभरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये इफ्फीचे स्थान अढळ असून, एखाद्या दीपस्तंभासारखा हा महोत्सव दिशादर्शक म्हणून काम करतो, असे ड्युपाँ म्हणाले. आज-कालचे चित्रपट अधिक वास्तवदर्शी आणि आक्रमक स्वरुपाचे असतात. मात्र त्यातून आपल्या सभोवताली घडणाऱ्या सत्य घटनाच आपल्याला कळतात, त्यामुळे चित्रपट निर्मितीत झालेला हा बदल चांगलाच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ICFT-युनेस्कोच्या गांधी पुरस्काराबद्दल बोलतांना ड्युपाँ यांनी सांगितले की या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले चित्रपट इफ्फीमध्ये दाखवले गेले असून, युनेस्कोच्या निकषांच्या आधारावर ज्युरी पुरस्कारांची निवड करेल.
इफ्फी आणि ICFT यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को गांधी पुरस्कार दिला जातो. महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महात्मा गांधींच्या आदर्शांवर आधारीत चित्रपटाची या पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. यंदा या पुरस्कारासाठी 7 परदेशी चित्रपट आणि ‘बहत्तर हुरे’ या हिंदी चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. इफ्फी हा आशियातला सर्वात जुना आणि सर्वाधिक प्रतिष्ठेचा चित्रपट महोत्सव समजला जातो. यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात 76 देशांमधले 200 चित्रपट दाखवण्यात आले. त्याशिवाय चित्रपट निर्मितीशी संबंधित चर्चा सत्रे, सादरीकरण आणि इतर अनेक विशेष कार्यक्रम महोत्सवात आयोजित करण्यात आले होते.