“हेमंत करकरे ए डॉटर्स मेमोर बाय जुई करकरे-नवरे’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे – मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे धीरोदात्तपणे सामोरे गेले. समर्पित आणि अतिशय निर्मळ असलेले करकरे झुकले नाहीत, अशी भावना राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक के. के. कश्यप यांनी बुधवारी व्यक्त केली.
दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची कन्या जुई करकरे-नवरे लिखित “हेमंत करकरे ए डॉटर्स मेमोर बाय जुई करकरे-नवरे’ या पुस्तकाचे प्रकाशन कश्यप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. क्रॉसवर्डकडून या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कश्यप म्हणाले, मी औरंगाबादमध्ये नेमणुकीस होतो. त्यावेळी करकरे नुकतेच तेथे रूजू झाले. तेव्हापासून त्यांचा माझा परिचय झाला. करकरे अतिशय समर्पित तसेच निर्मळ होते.
करकरे यांचा वरिष्ठ सहकारी म्हणून माझा परिचय झाला. तेव्हा पहिल्याच भेटीत त्यांच्या कर्तव्याप्रति असलेल्या निष्ठेची जाणीव झाली. कठीण परिस्थितीत न डगमगता काम करण्याची प्रेरणा करकरे यांच्याकडून मिळाली, असे डॉ. वेंकटेशम यांनी सांगितले. कुलकर्णी म्हणाले, करकरे यांच्या कन्येने लिहिलेले हे पुस्तक पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरेल. जुई करकरे-नवरे यांनी प्रास्ताविक केले. शिरीष नवरे यांनी आभारप्रदर्शन केले.