परदेशात जाण्याच्या स्वप्नावरही पडेल पाणी
“ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’बाबत पोलीस प्रशासन गंभीर
पुणे – तुम्हाला परदेशात जायचेय, चांगली नोकरी करायची आहे, अशी आयुष्यात येणारी कुठलीच सुवर्णसंधी तुम्हाला गमवायची नाही, तर मग नववर्षाचे स्वागत करताना उत्साह, आनंदाच्या भरात मद्यपान करू नका, अन्यथा तुम्ही वाहतूक पोलिसांच्या “ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’ (डिडी) कारवाईमध्ये अडकला तर तुमच्या सर्व संधी कायमच्या हिरावल्या जाऊ शकतात.
नववर्षाचे स्वागत करताना मद्यपानाला प्राधान्य दिले जाते. मद्यपी वाहन चालवत असताना अनेकदा अपघात होऊन त्यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 1 जानेवारीला पहाटे 5 वाजेपर्यंत दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध “ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई केली जात आहे.
पोलिसांकडून मद्यधुंद वाहनचालकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची इत्यंभूत माहिती घेतली जाणार आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटलेही दाखल केले जातील. पोलिसांकडे संबंधित वाहनचालकांचे नोकरी, चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, व्हिसाद्वारे परदेशवारीला आदी कामे अडकवून ठेवणार आहेत.
मद्यपान करणाऱ्यांचे होणार “शुटींग’
मद्यपान करून वाहन चालवताना पोलिसांच्या चाचणीमध्ये आढळल्यानंतर पोलिसांकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. 130 हून अधिक ठिकाणी स्थिर, भरारी पथके व साध्या वेशातील पोलिसांचे गट मद्यपी वाहनचालकांची चाचणी घेणार आहेत. या संपूर्ण चाचण्यांचे छायाचित्रीकरण व शुटींग घेतले जाणार आहे. आतापर्यंत मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविल्यास न्यायालयात खटले दाखल केले जात होते. मात्र, आता मद्यपान करून वाहने चालवताना दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तींची वाहने तत्काळ जप्त करण्यात येणार आहेत.
“मद्यधुंद वाहनचालकांमुळे अपघात होऊन त्यांच्यासह इतरांच्याही जीवाला धोका असतो. यामुळे मद्यपान करून वाहने चालवू नयेत. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या कारवाईच्या नंतर चारित्र्य पडताळणी, नोकरी, पासपोर्ट, व्हिसा व अन्य कारणांसाठी मोठी अडचण ठरेल.’
– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त