महापौर चषक पीटी गणवेश खरेदीत लागेबांधे; ठराविक ठेकेदारासाठी नियमाला तिलांजली
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने महापौर चषक टीन ट्वेन्टी क्रीडा स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल 65 लाखांचे टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट व बुटांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत गोलमाल सुरू असून सर्वच्या सर्व नियमांना तिलांजली देण्यात आली आहे. ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात येत असलेल्या या निविदेसाठी पुरवठ्यासाठी केवळ दोन दिवस देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हा संपूर्ण खरेदीचा प्रकार म्हणजे पालिका अधिकाऱ्यांचा नवा पराक्रम असून सर्वसामान्यांच्या लाखो रुपयांची उधळण करण्यात येत असल्याचेच यातून समोर आले आहे. तर महापालिकेच्या इतिहासात पुरवठ्यासाठी एवढी कमी मुदत पहिल्यांदाच दिली जात आहे.
यापूर्वी घेण्यात येणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खुल्या गटातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्याऐवजी यापूर्वीपासून जानेवारी 2020 मध्ये शहर पातळीवरच 17 क्रीडा प्रकारांमध्ये शालेय महापौर चषक टीन 20 क्रीडा स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. या सपर्धेमध्ये मैदानी खेळ, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, जलतरण, स्केटिंग, हॉकी, कुस्ती, थ्रोबॉल, योगा, क्रिकेट, बास्केटबॉल, हॅन्डबॉल आणि कराटे अशा 17 प्रकारांत विद्यार्थी खेळाडू मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी खेळाडूंना पीटी गणवेश व बूट देण्यात येणार आहे. ही स्पर्धा 12 जानेवारी रोजी बालेवाडी येथील मैदानामध्ये होणार आहे.
खेळाडूंना आवश्यक पीटी गणवेशासाठी ई निविदा राबविण्यात येत आहे. खरेदीसाठी अंदाजे 65 लाख 20 हजार 300 रुपये खर्च येणार आहे. या निविदेची मुदत 28 डिसेंबर ते 4 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यत असणार आहे. त्यानंतर प्राप्त निविदेतून सर्वात कमी दर सदर करणाऱ्या कंपनीला पीटी गणवेश देण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे. मात्र निविदा सादर करण्याच्या मुदतीनंतर फक्त दोन दिवसांत आवश्यक गणवेशांचा पुरवठा करायचा आहे. पुरवठ्यासाठी अवघे दोन दिवस असल्याने ही निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सुमारे 65 लाखांचे पीटी गणवेश पुरविण्यासाठी किमान पंधरा दिवसांची मुदत देणे आवश्यक होते. मात्र दोन दिवसांची मुदत देऊन ठराविक कंपनीलाच ही निविदा देण्याचा घाट महापालिका प्रशासनाच्या वतीने घातला जात आहे. अवघे दोन दिवस मुदत असल्याने अनेक कंपन्या निविदा सादर करणार नाहीत. परिणामी जी कंपनी एखाद्या ठराविक दराने निविदा सादर करेल त्याच कंपनीला हे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यामध्ये ठेकेदार व प्रशासनाचे अर्थिक लागेबांधे असल्याचे उघड होत आहे. थेट पद्धतीनेच पीटी गणवेश खरेदी करण्यात येणार होते, मात्र यामध्ये महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर आरोप होऊ शकतात. यामुळेच दोन दिवसांची मुदत देऊन निविदा प्रक्रिया राबवल्याचा दिखावा महापालिका प्रशासनाच्या वतीने केला जात आहे.
इतिहासातील सर्वांत कमी मुदतीची निविदा
पालिकेतर्फे आयोजित स्पर्धेला क्रीडा समितीने अनेक महिन्यांपूर्वी परवानगी दिली. मात्र साहित्य खरेदीला क्रीडा विभागाने जाणीवपूर्वक उशीर करत ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून आयत्यावेळी ही प्रक्रिया राबविली. मोठ्या कंपनीला जरी ठेका दिल्यास शहरात साहित्य आणण्यासाठी किमान दोन-तीन दिवस लागू शकतात. मात्र या साहित्याची खरेदी ठेकेदाराने यापूर्वीच केल्याची शक्यता असून रिंग पद्धतीने हे काम कोणाला दिले जात याकडे लक्ष लागले आहे. पालिकेने आजपर्यंत राबविलेल्या निविदा प्रक्रियेतील सर्वांत कमी कालावधीची ही निविदा ठरली आहे.
तातडीची खरेदी असल्यावर पुरवठा करण्यासाठी पाच किंवा सात दिवसांची मुदत दिली जाते. ही निविदा राबविण्यासंदर्भात क्रीडा विभागाने उशीराने 26 डिसेंबर रोजी भांडार विभागाकडे प्रस्ताव दिला. त्यानुसार निविदा सादर करण्यासाठी नऊ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर त्यानंतर पुरवठा करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
– मुबारक पानसरे, सहायक भांडारपाल
या विभागात येण्यापूर्वी टीन 20 चा विषय आला होता. साहित्याचे किट देण्यासंदर्भात निर्णय घेण्यास उशीर झाला. किती विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेतील, हे निश्चित होत नव्हते. सामुहिक निर्णयानंतर खरेदीचा निर्णय झाला. संपूर्ण माहिती सध्या माझ्या हाती नसून उद्या याबाबतची पूर्ण माहिती देऊ
– संदीप खोत, सहायक आयुक्त, क्रीडा विभाग