हॉलीवूडमध्ये गाजलेल्या “रॅम्बो’चा बॉलीवूड रिमेक होणार असल्याची घोषणा काही वर्षांपूर्वी केली गेली होती. स्टॅलोनने केलेल्या रॅम्बोच्या रोलसाठी टायगर श्रॉफची निवडही झाली होती. रॅम्बोच्या लूकमधील टायगर श्रॉफचे पोस्टरदेखील तयार झाले होते.
मात्र, या सिनेमाला वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे उशीर होत गेला आणि अखेर हा सिनेमा बनण्यापूर्वीच गुंडाळला जातो की काय, अशी शक्यता वाटायला लागली होती. टायगर श्रॉफकडून “रॅम्बो’साठी तारखाच मिळत नव्हत्या. त्याने “गणपत’च्या भाग 1 आणि भाग 2 साठी तारखा दिल्या.
“हिरोपंती 2′ आणि “बागी 4′ साठीही तारखा दिल्या. त्यातच त्याचे वर्षभराचे बुकिंग झाले आहे. “वॉर 2′ नंतर “रॅम्बो’ला वेळ देण्याचे टायगर श्रॉफने सांगितले. त्यामुळे “रॅम्बो’ला आणखीन उशीर होणार असे लक्षात आल्यावर निर्माते सिद्धार्थ आनंद यांनी हिरो बदलण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी टायगर श्रॉफच्या जागेवर प्रभासची निवड करायचे ठरवले. त्यादृष्टीने प्रभासशी चर्चाही सुरू झाली आहे. जर प्रभासने हा सिनेमा स्वीकारला तर “रॅम्बो’ला प्रभासच्या अनुरूप बनवले जाईल. म्हणजे वेस्टर्न टच ऐवजी इंडियन टच दिला जाण्याची शक्यता असेल.