पुणे – करोनाबाधित आणि संशयित रुग्णांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. कोणत्याही नागरिकाला सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांच्या तपासणीची सोय पाच सेंटर्स मध्ये करण्यात आली आहे. या सेंटर्समध्ये बेडही ठेवण्यात आले आहेत.
यामध्ये सौम्य लक्षणे, तीव्र आजार आणि अतितीव्र आजार अशी लक्षणे असणाऱ्यांसाठी वेगवेगळी सेंटर्स उभारण्यात आली आहेत. सौम्य प्रकारची लक्षणे असणाऱ्यांसाठी एकूण सेंटर सहा असून तेथे 380 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर तीव्र आजार असणाऱ्यांसाठी आणि मध्यम प्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी पाच सेंटर तयार ठेवण्यात आले असून त्यात 750 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय अतितीव्र आजार उपचार केंद्र सेंटरची संख्या दोन आणि 38 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ढोलेपाटील रस्ता-नगररस्ता- वडगाव शेरी-संगमवाडी : खराडी-रक्षकनगर क्रीडा संकुल येथे फ्लू क्लिनिकची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे 70 बेड उपलब्ध आहेत. तीव्र आजारासाठी सर्व भागातील नागरिकांची उपचार व्यवस्था ससून रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय, लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय, पुणे महापालिकेचे डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तर अतितीव्र आजारासाठी ससून आणि सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय या दोन ठिकाणी व्यवस्था केली आहे.
घोले रस्ता-शिवाजीनगर-कोथरूड बावधन- औंध-बाणेर : परिसरातील नागरिकांसाठी बोपोडीतील कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल येथे 50 बेडची सोय केली आहे. याशिवाय तीव्र आजारावरील उपचारांसाठी वरील सर्व रुग्णालयांमध्ये जाता येणार आहे.
सहकारनगर – धनकवडी – सिंहगड रस्ता- वारजे कर्वेनगर : वडगाव धायरी येथील कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखन्यात 60 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
हडपसर-मुंढवा-कोंढवा-येवलेवाडी – वानवडी- रामटेकडी : वानवडी येथील कै. नामदेवराव शिवरकर प्रसुतिगृह आणि कोंढव्यातील कै. मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह येथे प्रत्येकी 10 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
कसबा-विश्रामबागवाडा- भवानीपेठ – बिबवेवाडी: सणस मैदान हॉस्टेल येथे 175 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.