मुंबई -: देशात काही शहरात पेट्रोलच्या किंमती शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. देशातल्या विरोधी पक्षांनी यावरुन केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर बोलणं म्हणजे धर्मसंकट असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे.
निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले की, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ तुम्हाला धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही’, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निर्मला सीतारामन यांच्या विधानाचा हा समाचार घेतला आहे.
दरम्यान ‘ पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. भाजपला सत्ता श्रीरामाच्या म्हणजे धर्माच्या नावावर मिळाली आहे. लोकांची सगळ्यात मोठी समस्या पेट्रोल- डिझेल दरवाढ आहे. या दरवाढीसंदर्भातील धर्मसंकट यूपीए सरकारवरही होतं. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे. तुम्ही तर पळ काढत आहात, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे.