मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
नारायणगाव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (खेड, आंबेगाव, जुन्नर) पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड केली असल्याचे पत्र दिले आहे, असे नमूद केले.
मकरंद पाटे यांची भारतीय विद्यार्थी सेनेपासून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 2000मध्ये भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख तर 2003 मध्ये विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर पाटे यांनी सर्व पदांचा राजीनामा देत 2006 मध्ये मनसेमध्ये सक्रिय झाले.
मनसे प्रमुखांनी दिलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडणार असून लवकरच खेड, आंबेगाव, जुन्नर भागातील पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून संघटना बांधणी करणार असल्याचे पाटे यांनी सांगितले. त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, रस्त्याचे प्रश्न, टोल माफी, 2010 मध्ये रेल्वे भरती प्रक्रियेत तरुणांना न्याय मिळवून देणे, नागरिकांचे तहसील कार्यालयातील प्रश्न मार्गी लावणे अशी अनेक कामे केली आहे.
काही नेते राज ठाकरे यांच्या संपर्कात
जुन्नर तालुक्यातील काही वरीष्ठ नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात चालू आहे. महायुती म्हणून (भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट) वरिष्ठांनी एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर आपली ऐनवेळी अडचण होऊ नये म्हणून भेटीगाठी होत असल्याचे बोलले जात आहे.