भाजपच्या नेत्याचे थेट करोना विषाणूला आव्हान
नवी दिल्ली : चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. कारण देशात करोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 30 वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात चिंता व्यक्त केली जात असतानाच उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या एका नेत्याने थेट या विषाणूलाच आव्हान दिल्याची माहिती समोर आली आहे.
करोनामध्ये हिंमत असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये घुसून दाखवावं असे आव्हान भाजपाचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी केले आहे. करोना विषाणूमध्ये हिंमत असेल तर त्याने (माझा मतदारसंघ असणाऱ्या) लोनीमध्ये घुसून दाखवावं,असे वक्तव्य गुर्जर यांनी एका पत्रकाराला फोनवर दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे. या संवादाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये गुर्जर यांनी, लोनीमध्ये रामराज्य आहे. आमच्याकडे नऊ गोशाळा आहेत. माझ्या मतदारसंघातील लोकं धर्म अन् कर्माबद्दल जागरुक आहेत. जिथे गाईचा वास आहे तिथे जगातील कोणताचा विषाणू येऊ शकत नाही, असा दावा गुर्जर यांनी केला आहे. करोनाच काय तर इतर कोणताच विषाणू आमच्या येथे येऊ शकत नाही असा विश्वास गुर्जर यांनी व्यक्त केला आहे.
एवढेच नाही तर त्यांनी, करोनाला केवळ आव्हान देऊन गुर्जर थांबले नाहीत तर त्यांनी थेट करोना नष्ट करु असेही वक्तव्य केले आहे. कोणत्याही विषाणूने इथल्या नागरिकांना त्रास दिला अथवा मारण्याचा प्रयत्न केला किंवा आजार पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी आम्ही पुरेसे आहोत. आम्ही त्याला ठीक करु. लोनीमध्ये कोणताही विषाणू वाचणार नाही. इथे कोणता विषाणू येणारच नाही ही आमची जबाबदारी आहे, असे गुर्जर म्हणाले.