नवी दिल्ली – जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम ३७० केंद्रातील भाजप सरकारने रद्द केले होते. सरकारच्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले असून निर्णय वैध असल्याचे म्हटले आहे. त्या अनुशंगाने कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी विविध प्रश्नांना उत्तर देत कॉंग्रेसची भूमिका मांडली आहे.
केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाशी आम्ही असहमत आहोत. मात्र जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबत आणि तेथे लवकर निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने केंद्राला जे निर्देश दिले आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
केंद्रात कॉंग्रेसची सत्ता आली तर कलम ३७० पुन्हा आणणार का असा प्रश्न चिदंबरम यांना यावेळी विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की आम्ही पुन्हा कलम ३७० आणण्याबाबत कधीच काही बोललो नव्हतो. ते ज्या पध्दतीने हटवण्यात आले त्याला आमचा विरोध होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालात अनेक महत्वाच्या बाबींचे निरसन झाले आहे. तथापि, अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहेत. ४७६ पानांचे हे निकालपत्र असून त्याचा अभ्यास करायला आम्हाला वेळ लागेल. ज्या पध्दतीने ३७० हटवण्यात आले ते आम्हाला मान्य नव्हते आणि कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही त्याच्या विरोधात ठरावही संमत केला होता असे त्यांनी नमूद केले.
यावेळी कॉंग्रेसचे अन्य नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि त्यांच्या आजच्या निर्णयामुळे आजपासून हा वाद संपला आहे. हा अंतिम निर्णय असून त्यावर आता आम्ही फेरविचार करणार नाही.