जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अचानक केली कामाची पाहणी
नगर – जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज शहरातील अमृत योजनेतील पाणी पुरवठ्याच्या कामाची पाहणी मुळाधरण ते विळद पंपिंग स्टेशनपर्यंत केली. यावेळी ज्या शेतकऱ्यांना अमृत योजनेच्या कामाची नुकसान भरपाई देऊनही कामात अडथळा आणत आहेत अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन काम चालू ठेवण्यात यावे,” असे आदेश द्विवेदी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकारणचे कार्यकारी अभियंता एम.जी. सराफ, उपअभियंता अजय मुळे, महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे, शोनन इंजिनिअरिंग वर्कसचे संचालक डॉ. दयानंद पानसे आदी उपस्थित होते.
शहराला पाणी पुरवठा करणारी योजना 50 ते 60 वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा यंत्रणेचे काम सध्या अमृत व फेज 2 योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. नगर शहरामध्ये फेज-2 पाणी योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र शासनाच्या 107 कोटी रूपयांची अमृत योजने अंतर्गत अमृत पाणी योजनेचे 12 कामे सुरू आहेत. या योजनेच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी मुळा धरण, विळद पंपीग स्टेशनसह विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधीतांना योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
ही योजना लवकर पूर्ण झाल्यानंतर नगर शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. मुळा धरणात पाण्यामध्ये आरसीसी ब्रीज करण्याचे काम रखडले आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आले. या योजनेचे काम सुमारे 35 किमीचे आहे. मुळा धरण ते विळद ते वसंत टेकडी पाईप टाकणे हे काम सुमारे 18 किमी चे काम पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना पीकपाणी नुकसान भरपाई देवूनही काही शेतकरी पाईप टाकून देत नाही यासाठी महसूल विभागाशी चर्चा करून पोलीस बंदोबस्तात लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्यावे. त्याच बरोबर विळद येथे 45 दशलक्ष क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश दिले.
वसंत टेकडी येथे 50 लाख लीटर जमिनीवरील जलकुंभ तयार आहे. मुळाधरण येथील ब्रेकप्रेशर टॅंक 2.2 दशलक्ष लिटर या कामाची पाहणी त्यांनी केली. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर नगर शहरातील नागरिकांना पूर्ण दाबाने मिळणार आहे. या योजनेच्या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा करून नये ठेकेदाराने कामांना गती द्यावी. गेली दोन दिवस द्विवेदी यांनी फेज-2 पाणी योजना अमृत पाणी योजना, अमृत भुयार गटार योजनेचा आढावा घेवून कामाची सद्यस्थितीची माहिती घेतली. आज अचानक अधिकाऱ्यां समवेत मुळाधरण, विळद घाट या ठिकाणी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून माहिती घेतली.