तापमानाचा पारा 1 ते 2 अंशांनी घसरण्याचा स्कायमेटने वर्तविला अंदाज
पुणे – उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानात घट होणार असून, येत्या 24 तासांत राज्यात थंडी वाढणार आहे. पुण्यासह मुंबई, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 1 ते 2 अंशांनी घसरणार आहे. तसेच, विदर्भ आणि छत्तीसगडच्या लगतच्या भागांमध्ये वाऱ्यांचे संगम क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटतर्फे वर्तविण्यात आली आहे.
उत्तर भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिक, पुणे, मुंबई आणि जळगाव येथे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तापमानात 1-2 अंशांची घट अपेक्षित आहे. विदर्भातही येत्या 24 तासांत तापमानात किरकोळ घसरण होऊ शकते, असा अंदाज “स्कायमेट’ या हवामानविषयक पूर्वसूचना देणाऱ्या संस्थेकडून देण्यात आला आहे.
येत्या 7 फेब्रुवारीपर्यंत किमान तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदले जाण्याची शक्यता असून त्यानंतर हे वारे आग्नेय दिशेने वाहू लागतील. ज्यामुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
पुढील 24 तासांनंतर विदर्भ आणि छत्तीसगडलगतच्या भागांमध्ये वाऱ्यांचे संगम क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे गोंदिया, नागपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागात हवामान मात्र कोरडेच राहील असे, स्कायमेटकडून सांगण्यात आले आहे.