ख्राईस्टचर्च – गतविजेत्या इंग्लंडने गुरुवारी झालेल्या महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 137 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून येत्या रविवारी त्यांची विजेतेपदासाठीची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 294 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 38 षटकांत 156 धावांवर संपुष्टात आला. संघाची धावसंख्या 1 असताना त्यांची सलामीवीर लॉरा व्होल्वहार्ट बाद झाली व त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. मिगनोन डू प्रेझने 30, लारा गुडॉलने 28 धावांची खेळी केली. सुन लुस, मरिझन केप व त्रिशा चेट्टी यांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. मात्र, अन्य फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. इंग्लंडकडून सोफी एक्केलस्टोनने 6 गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची वाताहत केली. ऍना श्रुबसोलने 2 गडी बाद केले. शार्लेट डीन व केट क्रॉस यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
गतविजेत्या इंग्लंडच्या महिला संघाने गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर 294 धावांचे आव्हान उभे केले. इंग्लंडची सलामीवीर फलंदाज डॅनेल वॅटने 125 चेंडूत 129 धावांची दमदार शतकी खेळी केली. सोफी ड्युंक्लेने 75 चेंडूत 60 धावा फटकावल्या. या दोघींच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकांत 8 गडी गमावून 293 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार सुन लुसने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या धावफलकावर अवघ्या 10 धावा असताना टॅमी ब्युमेट 7 धावांवर बाद झाली. इंग्लंडची कर्णधार हेदर नाइट केवळ 1 धाव काढून परतली. त्यानंतर एमी जोन्सच्या साथीत डॅनिल वॅटने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी चौथ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. एमी 28 धावांवर बाद झाली. त्यानंतर सोफिया आणि वॅट यांनी पाचव्या गड्यासाठी 116 धावांची भागीदारी केली.
वॅटने 125 चेंडूत 129 धावा करून बाद झाला. सोफियानेही 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून शबनम इस्माइलने 3 गडी बाद केले. मारिझन केप व मसबता या दोघींनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. आयाबोंगा खाकाने 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड – 50 षटकांत 8 बाद 293 घावा. (डॅनेल वॅट 129, सोफी ड्युंक्ले 60, शबनम इस्माइल 3-46). दक्षिण आफ्रिका – 38 षटकांत सर्वबाद 156 धावा. (मिगनोन डू प्रेझ 30, लारा गुडॉल 28, सुन लुस 21, मरिझन केप 21, त्रिशा चेट्टी 21, सोफी एक्केलस्टोन 6-36, ऍना श्रुबसोल 2-27).