मेलबर्न :- भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला सलग दोन पराभव स्वीकारावे लागल्यावर त्यांच्या माध्यमांनी कर्णधार पॅट कमिन्सवर टीकेची झोड उठवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या आजवरच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात दुबळा कर्णधार असा त्याचा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली आहे.
1980 सालच्या दशकापासून ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजची जागतिक क्रिकेटवरची मक्तेदारी संपूष्टात आणली व जवळपास 2015 सालापर्यंत त्यांनी अधिराज्य गाजवले. त्यातही एकदिवसीय सामने सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने क्रिकेटच्या या प्रकारातही दबदबा निर्माण केला व तब्बल 5 वेळा विश्वकरंडक जिंकला. यंदा मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्वीच्या संघांच्या तुनेत खूपच कमकुवत ठरत आहे. मुख्य म्हणजे संघाचा कर्णधार कमिन्स याच्याकडे आक्रमकता नाही व हीच आक्रमकता ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वातील सर्वात मोठी गोष्ट ठरली होती.
यंदाच्या स्पर्धेत सलग दोन सामने त्यांनी गमावले. आता त्यांना स्पर्धेतील आव्हान टिकवायचे असेल तर पुढील सर्व सामने जिंकावेच लागणार आहेत, मात्र, ही स्पर्धा पार पडल्यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला नवा कर्णधार निवडावा लागणार आहे, असेही माध्यमांनी म्हटले आहे.
कमिन्सची देहबोली कर्णधाराची वाटत नाही. तो अन्य खेळाडूंनाही प्रोत्साहीत करु शकलेला नाही. संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी अत्यवश्यक असलेला अनुभवही त्याच्याकडे नाही. केवळ चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत त्याचे नेतृत्व यशस्वी ठरेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला वाटला याचेही आश्चर्य वाटतो. संघातील नवोदित व वरिष्ठ खेळाडूंमध्ये जो समतोल असावा लागतो तोच या संघात दिसत नाही. एकूणच यंदाच्या स्पर्धेत उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ एखाद्या नवख्या संघासारखी कामगिरी करत आहे. जर पराभवांची मालिका अशीच सुरू राहीली तर गत स्पर्धेप्रमाणे यंदाच्या स्पर्धेतही त्यांना यश मिळणार नाही, असेही येथील माध्यमांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया 10 संघांच्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -1.846 आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातील दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.