Siraj back to No. 1 in ICC ODI rankings : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत सिराजला आठ स्थानांचा फायदा झाला. तो थेट नवव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहचला आहे. आशिया कप फायनलमध्ये घातक गोलंदाजीचा फायदा सिराजला झाला. त्याने अंतिम सामन्यात 21 धावांत सहा विकेट घेतल्या होत्या.
सिराजनं आशिया कपमध्ये एकूण 10 विकेट घेतल्या. सिराज दुसऱ्यांदा नंबर वन गोलंदाज बनला आहे. याआधी मार्च 2023 मध्येही तो नंबर वन गोलंदाज होता. सिराजच्या आधी ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड नंबर वन गोलंदाज होता. हेझलवूडशिवाय सिराजने ट्रेंट बोल्ट, राशिद खान आणि मिचेल स्टार्क सारख्या गोलंदाजांनाही मागे टाकले आहे.
अफगाणिस्तानचे फिरकीपटू गोलंदाज मुजीब उर रहमान आणि रशीद हे वनडे क्रमवारीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पोहचले आहेत. सिराज व्यतिरिक्त, अव्वल 10 मध्ये हेच दोन गोलंदाज होते ज्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
दुखापतीतून पुनरागमन केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने क्रमवारीत बरीच प्रगती केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले दोन सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला शेवटचे तीन सामने जिंकून देण्यास व मालिका काबीज करण्यास केशव महाराजने मोलाचे योगदान दिले. या डावखुऱ्या फिरकीपटूने पाचव्या एकदिवसीय सामन्यात 33 धावांत चार बळी घेतले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने एकूण आठ विकेट घेतल्या. तो सध्या 15 व्या स्थानावर आहे. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम क्रमवारी आहे.