नवी दिल्ली – भारतात दोन करोना प्रतिबंधक लसींना मर्यादीत आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. यात सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे. देशातील दुर्गम भागासह सर्वत्र लस पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या वाहतूक ताफ्यातील विमानांचा वापर करण्यात येणार आहे. यात सी-130जे आणि एएन-32 सारखी मोठी विमाने वापरण्यात येणार आहेत.
लस उत्पादकांनी विशेष कंटेनर्सची व्यवस्था केली आहे. वाहतुकी दरम्यान लसी अपेक्षित तापमानात स्टोअर करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला दिली.
अरुणाचल प्रदेश, लडाख सारख्या दुर्गम भागांमध्ये लसी पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यातील मालवाहतूक विमानांचा वापर करणार आहे. तसेच हवाई मार्गे लस पोहोचवण्यासाठी मोठया प्रमाणात व्यावसायिक विमानांचा वापरही केला जाणार आहे.
एअर फोर्स या व्यावसायिक विमानांना लष्करी धावपट्ट्यांचा वापर करण्याची परवानगी देईल. या योजनेनुसार, गरज पडल्यास लस पोहोचवण्यासाठी एअरफोर्स आपल्या हेलिकॉप्टर्सचा सुद्धा वापर करेल. लस वाहतुकी संदर्भात अजून चर्चा सुरु आहे. लवकरच या बद्दल अंतिम रुपरेषा निश्चित केली जाईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.