हॉंगकॉंग – अमेरिकेतील मानवी हक्क विषयक वकिलाला हॉंगकॉंगमध्ये लोकशाही आंदोलनाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे. हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीवादी कार्यकर्त्यांच्या अटकसत्रादरम्यान या वकिलालादेखील अटक केली गेली. मात्र त्यांना जामीन देखील मंजूर झाला असल्याचे त्यांच्या सहकाऱ्याने गुरुवारी संगितले.
जॉन क्लान्सी असे या अमेरिकेतील वकिलाचे नाव असून हॉंगकॉंगमधील हो त्से वाई ऍन्ड पार्टनर्स या लॉ फर्मसाठी ते काम करत असतात. बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत 53 जणांना अटक करण्यात आली तेंव्हा त्या सर्वांसमवेत क्लान्सी हे देखील होते. हॉंगकॉंगमध्ये कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू झाल्यापासून हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अटक सत्र होते.
हॉंगकॉंगम्धील लोकशाही यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी प्राथमिक पातळीवर अनौपचारिक निवडणूका घेण्याचा प्रयत्न लोकशाहीवादी गटांनी केला होता. बुधवारी अटक झालेले बहुतेक जण या निवडणूकांमधील उमेदवार होते. क्लान्सी हे “पॉपवर फॉर डेमोक्रसी’ या गटाचे खजिनदार आहेत.