नवी दिल्ली : कुठल्याही स्त्रीला ९ महिने आपल्या उदरात वाढणाऱ्या बाळाला पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. बाळ पोटात राहिल्यापासूनच ती आपल्या जिवापेक्षा जास्त त्याचा विचार करते. पण जर एखाद्या आईने जन्म दिल्यानंतर लगेच आपल्या डोळ्यादेखत त्याच चिमुकल्या जीवाचा अंत पाहिला तर…हा विचार देखील आपण करू शकत नाही पण अशी सत्य घटना लखनऊमध्ये घडली आहे. आपल्याच पोटच्या गोळ्याला जन्म देऊन त्या मातेला त्याच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागली आहे.
लखनऊच्या खासगी रुग्णालयात नवजात बालक नर्सच्या हातातून निसटल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतर या बाळाला नर्सने टॉवेलमध्ये न गुंडाळता बाळाला तसेच हातात धरले होते, मात्र बाळ नर्सच्या हातातून निसटले आणि जमिनीवर पडल्याने डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. पण हॉस्पिटल स्टाफने ही घटना लपवण्यासाठी नवजात बाळ मृत जन्मल्याचे कुटूंबियांना सांगितले होते. १९ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर नवजात बाळाचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचे समोर आले.
मंगळवारी एका पत्रकाराने पोस्टमार्टम रिपोर्ट बघितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखनऊ पोलिसांनी नर्स आणि हॉस्पिटल स्टाफच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तपास अधिकारी अभिषेक पांडे यांनी मृत नवजात बालकाचे पोस्टमार्टम घटनेच्या दिवशीच झाल्याचे सांगितले. २० एप्रिल रोजी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बाळाच्या मृत्यूचे कारण समोर आले. अतिरिक्त पोलिस आयुक्त कासीम सिद्दीकी यांनी हलगर्जीपणामुळे नवजात शिसूचा मृत्यू झाल्याचे सांगितले, तसेच २४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.
मृत बाळाच्या वडील जीवन राजपूत यांनी चिन्हाट पोलिस स्टेशनमध्ये फॉर्मल कम्पलेंट दाखल केली होती. बाळाच्या आईने, आपण बाळाला जिवंत पाहिलं असून नर्सने बाळाला टॉवेलमध्ये न गुंडाळता उचललं होतं, तिच्या हातातून बाळ निसटलं, हे पाहून ओरडताच, स्टाफले तिचं तोंड दाबलं आणि धमकावले. या घटनेनंतर तिला धक्का बसला असून तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.