मुंबई – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ लोकशाही वृत्तवाहिनीवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमुळे भाजपसह सर्वच पक्षाचे नेते यावर बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याविषयीच्या चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट सोमय्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यामध्ये काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर शाब्दिक टीका केली आहे. विधिमंडळात देखील आज हाच मुद्दा गाजला असून, विरोधकांनी देखील सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, असं असलं तरी या व्हायरल व्हिडीओप्रकरणी विरोधकांकडून टीका होत असताना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी किरीट सोमय्यांसाठी थेट परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,
“किरीट सोमय्यांचा संबंधित व्हिडीओची सत्यता आणि चौकशी व्हावी या करता त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रा मार्फत मागणी केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खोटा आणि बनावट निघावा, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो..’ असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.