सोलापूर : भाजपा नेते सदाभाऊ खोत यांच्यावर २०१४ पासून बिल थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ज्या हॉटेलचे बिल थकित आहे त्या हॉटेल मालकाने थेट सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे.
सदाभाऊ खोत पंचायत राजच्या कामासाठी सांगोल्याच्या दौऱ्यावर असताना हॉटेल मालक अशोक शिंगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडवत थकीत बिलासंदर्भात जाब विचारण्यास सुरुवात केली. या प्रकरणी हॉटेल मालक अशोक शिंगारे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सदाभाऊंनी हॉटेल मालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला होता. आता या हॉटेल मालकाचं स्पष्टीकरण आलं आहे.
अशोक शिनगारे म्हणाले की, सदाभाऊ खोत हा फसवा माणूस आहे, ते काहीही बोलतील, हे जगजाहीर झाले आहे. मी शेतकरी संघटनेचे काम करत होतो म्हणून सदाभाऊंवर माझं प्रेम होते. ते आता शरद पवारांसारख्या माणसाला बदनाम करू शकतात तर मग माझ्यासारख्याला बदनाम का करणार नाहीत, असा प्रश्न शिनगारे यांनी उपस्थित केला. ते पुढं म्हणाले की, बदनामी करणे भाजपाचा पेशा आहे. मी तंतोतंत आकडा सांगू शकत नाही. पण माझे ६६ हजार ४५० रुपये बिल सदाभाऊंनी द्याव असंही शिनगारे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान सदाभाऊ हे शेतकरी चळवळीतील नेते आहे. माझा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. मी शेतकरी संघटनेचा चळवळीचा कार्यकर्ता आहे. माझ्यावर शेतकरी आंदोलनाचे विविध गुन्हे आहेत. त्याची चौकशीही करू शकता, असं शिनगारे यांनी म्हटलं. तसेच मला स्वत: सागर खोत भेटायला आले होते. त्यांच्या सांगण्यावरून ८ ते १० दिवस कार्यकर्त्यांना जेवण खायला घातलं. मला सागर म्हणाले होते, तुमचं बिल लाख होऊ द्या अन्यथा दीड लाख भरून देऊ. मात्र अद्याप बिल दिलं नाही, असंही शिनगारे यांनी सांगितलं.