कोल्हापूर – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. मुंडे प्रकरणात चौकशी करावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर माझा मूळीच विश्वास नाही. पोलिस खाते त्यांचे काम करत आहे. त्यांचा ज्यावेळी निष्कर्ष येईल त्यावेळी भाष्य करेन, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते आहे, या इच्छेवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल प्रतिक्रीया दिली आहे. “मग त्यात काय झाले. त्यांना शुभेच्छा…’ असे पवार म्हणाले. ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी पाटलांची फिरकी घेत उद्या मलाही वाटेल. मुख्यमंत्री व्हावे, कोणी करणार का? असे सांगत एक सुचक इशारही दिला.
राज्यपाल नियुक्त आमदार संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एकदा प्रस्ताव दिला की, त्यानंतर राज्यपाल यांनी कधीही हा प्रस्ताव फेटाळला नाही. इथे मात्र दुसरेच काहीतरी दिसत आहे, असे सांगत अप्रत्यक्षरित्या राज्यपाल यांच्या कार्यपध्दतीवरही पवारांनी नाराजी व्यक्त केली.