नवी दिल्ली – भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केल्याने अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांची भाची असलेल्या अमेरिकन वकिल मीना हॅरीस यांना धमक्या देणारे ट्विट आले आहेत. या पार्श्वभूमीवर मीना हॅरीस यांनी पुन्हा भारतातील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन दिले असून असल्या धमक्यांनी मला काहीं फरक पडत नाही, तुम्ही माझा आवाज दाबून टाकू शकत नाही असे म्हटले आहे.
मी शेतकऱ्यांच्या बाजूने मतप्रदर्शन केल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळाला आहे ते पहा असे नमूद करीत त्यांनी त्यांच्या विरोधात झालेल्या निदर्शनांचा एक फोटो शेअर केला असून त्यांच्या मूळ पोस्ट वर व्यक्त झालेल्या काही प्रतिक्रीयाही त्यांनी शेअर केल्या आहेत. असल्या प्रतिक्रियांनी किंवा धमक्यांनी मला काहीं फरक पडत नाही असे नमूद करीत त्यांनी पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबाच दिला आहे.
36 वर्षीय मीना हॅरीस या लेखिकाही आहेत. त्यांनी या आधीही सातत्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ग्रेटा थनबर्ग, रिहाना आणि मीना हॅरीस यांच्या बरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातनाम व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समर्थन देणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी दिल्लीच्या सीमांवरील तसेच हरियाणातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याच्या प्रकरणालाही अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोठे महत्व दिले असून सीएनएनने यावर जी एक स्टोरी प्रसारीत केली आहे त्याचा व्हिडीओ रिहाना, ग्रेटा आणि मीना हॅरीस यांच्यासह अनेकांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.