चेन्नई – कर्णधार ज्यो रूटने श्रीलंकेतील फॉर्म भारतातही कायम ठेवताना दमदार नाबाद शतकी खेळी केली. आपल्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळत असलेल्या रूटने शतक साकार केले. शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 3 गडी गमावून 263 अशी आश्वासक मजल मारली आहे. रूट 128 धावांवर नाबाद असून डॉमनिक सिबली 87 धावांवर बाद झाला.
रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी निर्जिव असल्याचे पहिल्या षटकापासूनच स्पष्ट होत गेले.याच पहिल्या षटकात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर रोरि बर्नला जीवदान दिले. त्यानंतर मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताला लवकर संधीच दिली नाही. बर्न व सिबली यांनी 63 धावांची सलामी दिली. बर्नला रवीचंद्रन अश्विनने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर जसप्रीतबुमराहने मायदेशातील पहिला कसोटी बळी मिळवताना डॉनियल लॉरेन्सला खाते उघडण्यापूर्वीच तंबूत धाडले.
दोन बळी एकाच धावसंख्येवर मिळाल्यानंतर मात्र, कर्णधार रूट व सिबलीने भारताच्या एकाही गोलंदाजाला संधी दिली नाही. त्यांनी भारताच्या सर्व गोलंदाजांचा नेटाने सामने केला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी दमदार द्विशतकी भागीदारी केली व संघाला अडीचशे धावांच्या पुढे मजल मारून दिली. दरम्यान या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर जसप्रीत बुमराह, अश्विन, नवोदीत शाहबाज नदिम व इशांत शर्मा यांची गोलंदाजी या दोन्ही फलंदाजांनी शांतपणे व सावधरीत्या खेळून काढली.
रुटने त्यावेळी शतकाकडे कूच केली होती. हा सामना रूटच्या कसोटी कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना होता. त्याने आपले शतकही साकार केले. दुसरीकडे सिबलीनेही शतकाकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र, बुमराहने पुन्हा एकदा भारताला ब्रेक मिळवून देताना सिबलीला पायचित केले. खेळ थांबला तेव्हा रूट 128 धावांवर खेळत आहे. त्याने आपल्या शतकी खेळीत 197 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. सिबलीने आपल्या87 धावांच्या खेळीत तब्बल 286 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार फटकावले. भारताकडून बमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 40 धावांत 2 गडी बाद केले. अश्विनने 68 धावांत एक गडी बाद केला.
भारतीय संघाने आपल्या संघात आश्चर्यकाररीत्या नवोदीत फिरकी गोलंदाज शहबाज नदिमचा समावेश केला.अक्सर पटेलला दुखापत झाल्यामुळे नदिमला संधी देण्यात आली. तसेच ऑस्ट्रेलियातील विजयी संघाचा शिलेदार महंमद सिराजच्या जागी अनुभवी इशांत शर्मा याचा संघात समावेश केला. या सामन्याद्वारे नियमित कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला व त्याने बदली कर्णधार अजिंक्य रहाणेकडून नेतृत्व हाती घेतले.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव – 89.3 षटकांत 3 बाद 263 धावा. (रोरी बर्न 33, डॉमनिक सिबली 87, ज्यो रूट खेळत आहे 128, जसप्रीत बुमराह 2-40, रवीचंद्रन अश्विन 1-68).