Amir khan : दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासह बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना यासारखी कलाकार मंडळी होती. एकीकडे या चित्रपटाने मोठी कमाई केली तर काहींनी टीका देखील केली. जावेद अख्तर यांच्यानंतर आमिर खानची एक्स पत्नी किरण रावने देखील अॅनिमल चित्रपटावर टीका केली होती.
अॅनिमल सिनेमात पुरुषांनी स्त्रियांवर वर्चस्व गाजवल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. ‘लपता लेडीज’ची दिग्दर्शक आणि आमिर खानची एक्स पत्नी किरण रावने या सिनेमाला वाईट संबोधले होते. तेव्हा ‘ॲनिमल’ दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी प्रत्युत्तर दिले होते. किरण रावने पहिले आमिर खानचे चित्रपट बघावे. या प्रकरणावर आता आमिर खाननेही माफी मागितली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
संदीप रेड्डी वंगा काय म्हणाले?
संदीप रेड्डी वंगा यांनी ‘दिल’ चित्रपटातील दृश्याचा उल्लेख केला, ज्यामध्ये आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांच्यातील भांडण दाखवण्यात आले होते. यामध्ये आधी आमिरचे पात्र महिलेला मारताना आणि धमकावताना दाखवले गेले. सुरुवातीला आमिरचे पात्र तिच्यावर जबरदस्ती करतो आणि नंतर ते प्रेमात पडतात असे दाखवले होते. एका मुलाखतीत संदीप म्हणाले होते की, ‘मी त्या महिलेला सांगू इच्छितो की, त्यांनी आधी आमिर खानला खंबे जैसी खडी है…’ या या गाण्याबद्दल विचारावे…ते काय होते, आणि मग माझ्याकडे यावे.”
आता आमिर खानने त्या गाण्याबद्दल आणि त्यातील लिरीक्सबद्दल माफी मागितली आहे, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमिर खान म्हणाला की, ‘जेव्हा आपण चित्रपटांमध्ये काही चुकीचे दाखवतो तेव्हा त्याचा परिणाम सकारात्मक होतो हेही आपण दाखवतो. पण ते चुकीचे आहे. आपण अनेकदा चित्रपटांमध्ये स्त्रियांना एक वस्तू बनवतो. मग ती गाणी सुद्धा जसे की, ‘तू चीज बडी मस्त मस्त’ वगैरे… आणि यात माझाही समावेश आहे. मी असे चित्रपट केले आहेत. ‘खंबे जैसी खडी है…लडकी है या छडी है…’ गाण्यात आपण स्त्रीला खांब म्हणतो पण माणूस नाही. याची मला खूप लाज वाटते,” असे म्हणत त्याने माफी मागितली.