देशात हायब्रीड ट्‌विन विद्यापीठाचा प्रस्ताव

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची दारे होणार उघडी 
नगर –
अद्यावत शिक्षण व तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून देशाचा विकास साधण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने देशातील विद्यापीठांना परदेशी विद्यापीठ संलग्न करुन हायब्रीड ट्‌विन विद्यापीठ निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

यामुळे शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडून भारत देशाचा प्रगत राष्ट्रांमध्ये समावेश होणार असल्याचा विश्‍वास संघटनांच्यावतीने व्यक्त करण्यात आला. देशाचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती होण्याची गरज आहे. परदेशातील नामवंत विद्यापिठात शिकवले जाणारे कॉन्टम फिजिक्‍स, रॉकेट सायन्स, हायर कॉन्शीयसनेस, एन्व्हायरमेंटल करेकशन्स यांसह विविध प्रकारचे शिक्षण भारतातील विद्यापीठांमध्ये मिळत नाही.

ही परदेशातील नामांकित विविध विद्यापीठ देशाच्या विद्यापीठांशी संलग्न झाल्यास तेथील ज्ञान भारतातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. परदेशात फक्त श्रीमंत घरातील मुले शिकण्यास जातात व तेथेच स्थायिक होतात. यामुळे त्यांच्या शिक्षणाचा फायदा आपल्या देशाला होत नाही. परदेशी विद्यापीठ देशातील विद्यापीठांना संलग्न केल्यास येथील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची दारे उघडी होणार असल्याचे ऍड. कारभारी गवळी यांनी म्हटले आहे.

हायब्रीड विद्यापीठासाठी संघटनेतर्फे लवकरच केंद्रशासनाला प्रस्ताव पाठवणार आहे, नवीन भाजप सरकार या क्रांतिकारक बदलाचा स्वीकार करणार असल्याची अपेक्षा संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. या मागणीसाठी ऍड. गवळी, जालिंदर बोरुडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, अंबिका नागुल, किशोर मुळे, लतिका पाडळे, लिला रासने, नजमा शेख, फरिदा शेख, जयश्री भुजबळ, मनीषा नन्नवरे प्रयत्नशील आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.