सातारा -कारंडवाडी, ता. सातारा येथील एका महिलेच्या पतीच्या चोरीला गेलेल्या मोबाइलमधील माहितीच्या आधारे संबंधितांच्या बॅंक खात्यातून 6 लाख 45 हजार 63 रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
कारंडवाडीतील एका महिलेच्या पतीचा मोबाइल चोरीला गेल्याने, तिने आपल्या बॅंक खात्याची माहिती दुसऱ्याच्या फोनवरुन घेतली असता, रविवारी (दि. 3) सकाळी दोन वेळा मिळून 40 हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे समजले. याची माहिती महिलेने पतीला दिली. त्याने पत्नीला बॅंकेत जाऊन खाते बंद करायला सांगितले.
त्यादिवशी सुट्टी असल्याने महिलेने स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अत्यावश्यक सेवेच्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी तिला “एनी डेस्क’ ऍप डाऊनलोड करून, पुढील प्रक्रिया करायला सांगण्यात आले. त्यानुसार प्रक्रिया केली असता, दोघांच्या एकत्र बॅंक खात्यातून रविवारी (दि. 3) व सोमवारी (दि. 4) एकूण सहा लाख 45 हजार 63 रुपये काढून घेण्यात आल्याचे लक्षात आले. पोलीस निरीक्षक सजन हंकारे तपास करत आहेत.