नाका तोंडात फेविक्विक टाकून मारले नव-याला

बिहारमधील गया येथे एक धक्कादायक प्रकार

पाटणा – बिहारमधील गया येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेनेच आपल्या पतीची हत्या केली आहे. पतीची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी सर्वप्रथम त्या इसमाचे हात-पाय बांधले त्यानंतर चाकू हल्ला केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडिताच्या डोळे, तोंड आणि नाकात फेविक्विक टाकले.

पत्नीने केलेल्या या गुन्ह्यात तिच्या आई-वडिलांनीही तिला साथ दिल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीने सर्वप्रथम पतीला माहेरी बोलावले आणि त्यांतर आई-वडील, इतर दोघांच्या मदतीने पतीची हत्या केली.

हत्येची ही हृदयद्रावक घटना मृतक इसमाच्या साडेतीन वर्षीय मुलाच्या डोळ्यांसमोर घडली आहे. हत्या केल्यावर त्या इसमाच्या सासरच्यांनी मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान वाटेत गस्त घालणाऱ्या पोलिसांना पाहून आरोपींनी मृतदेह टाकून घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी गोणी उघडून पाहिली असता त्यात मृतदेह आढळून आला.

मृतकाचे नाव मुन्ना असे आहे. मुन्ना याचा विवाह जुली नावाच्या मुलीसोबत झाला होता. मात्र, जुली कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी मुन्ना याने जुली आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते. याच विषयावरुन मुन्ना आणि जुली यांच्यात वादही सुरू होता. प्रेम प्रकरणात अडथळा येत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने त्याची हत्या केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.